[go: nahoru, domu]

Jump to content

संचालन प्रणाली

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

संचालन प्रणाली किंवा 'ऑपरेटिंग सिस्टिम' म्हणजेच 'संगणक प्रणाली' हे संगणकाचे मूलभूत नियंत्रण करणारे सॉफ्टवेर आहे. ऑपरेटिंग सिस्टिम ही सॉफ्टवेरच्या 'सिस्टिमस् सॉफ्टवेर' ह्या वर्गीकरणात येते. ऑपरेटिंग सिस्टिम ही संगणकाच्या हार्डवेअरचे तसेच संगणकावर चालणाऱ्या इतर सर्व सॉफ्टवेर्सचे (उदा. वेब ब्राऊझर, ईमेल प्रोग्रॅम, वर्ड प्रोसेसर इ.) नियंत्रण करते. इतर सॉफ्टवेरना लागणाऱ्या काही मूलभूत सॉफ्टवेर सुविधा ऑपरेटिंग सिस्टिम पुरवते.

संचालन प्रणाली ही संगणकाच्या भौतिक घटकांचे (हार्डवेअरचे) कार्य, जसे की माहितीचे आदान प्रदान आणि स्मृतीचे वाटप, आणि संगणकावर चालणाऱ्या कार्यप्रणाली यांच्यामध्ये एक दुवा म्हणून कार्य करते. आपले इच्छित कार्य पूर्ण करण्यासाठी विविध कार्यप्रणाली (उदा. वेब ब्राऊझर, ईमेल प्रोग्रॅम, वर्ड प्रोसेसर इ.) संचालन प्रणालीच्या सेवा वापरतात.

संचालन प्रणाली ही विविध प्रकारच्या संगणक साधनांमध्ये आढळुन येते. उदा. भ्रमणध्वनी, विडिओ गेम उपकरणे, महासंगणक इ.

वैयक्तिक संगणकांमध्ये मायक्रोसॉफ्ट विंडोज, अ‍ॅपल मॅक ओ.एस. आणि मुक्त स्रोत प्रणाली - लिनक्स या प्रथम तीन लोकप्रिय संचालन प्रणाली आहेत. सेवादाता संगणक (सर्व्हर) आणि महासंगणकांमध्ये लिनक्सचा जास्त वापर केला जातो. संक्षिप्त उपकरणांमध्ये (उदा. भ्रमणध्वनी) गुगलची अँड्रॉइड आणि अ‍ॅपलची आय ओ.एस. लोकप्रिय आहे. या व्यतिरिक्त अंतर्भूत संचालन प्रणाली व सकाल संचालन प्रणाली असे विशिष्ट प्रकार ही आढळून येतात.

संचालन प्रणालींचे प्रकार

[संपादन]

एक-कार्यी आणि बहु-कार्यी

[संपादन]

एक-कार्यी प्रणाली एका वेळी एकच कार्यप्रणाली चालवू शकते तर बहु-कार्यी प्रणाली एका वेळी अनेक कार्यप्रणाली चालवू शकते. संगणकाच्या मध्यवर्ती प्रक्रियक विभागाची (CPU) वेळ, उपलब्ध सर्व कार्यप्रणालींमध्ये विभागून दिल्यामुळे हे शक्य होते. संचालन प्रणाली मधील कार्यवेळ-नियंत्रक उपप्रणाली, मध्यवर्ती प्रक्रियक विभागाच्या ठराविक काल-विभागाच्या अंतराने प्रत्येक चालू कार्यप्रणालीमध्ये व्यत्यय आणते आणि बाकी उपलब्ध कार्यप्रणालींना संधी देते. बहु-कार्यता दोन प्रकारे साध्य करता येते - प्रतिबंधात्मक (Preemptive) आणि सहकारी (co-operative) पद्धतीने. प्रतिबंधात्मक पद्धतीमध्ये सर्व कार्यप्रणालींना प्रक्रियकाचा काल-विभाग आधीच वाटून दिला जातो तर सहकारी पद्धतीमध्ये प्रत्येक कार्यप्रणालीने इतर कार्यप्रणालींना ठराविक पद्धतीने संधी देण्यावर अवलंबून राहावे लागते. आधुनिक संचालन प्रणालींमध्ये शक्यतो प्रतिबंधात्मक पद्धतीचा वापर होतो.

एक-उपयोगकर्ता आणि बहु-उपयोगकर्ता

[संपादन]

एक-उपयोगकर्ता प्रणाली उपयोगकर्त्यांमध्ये फरक करू शकत नाहीत. बहु-उपयोगकर्ता प्रणाली एका वेळी अनेक उपयोगकर्त्यांना संवाद साधू देतात. बहु-कार्यी प्रणालींप्रमाणेच बहु-उपयोगकर्ता प्रणाली अनेक उपयोगकर्त्यांमध्ये संगणकाच्या साधनांचे विभाजन व साधन हक्क यांचे नियंत्रण करते.

विकेंद्रित

[संपादन]

विकेंद्रित संचालन प्रणाली विविध संगणकांचा एक गट नियंत्रित करते व वापरकर्त्याला तो एकच संगणक असल्याचे भासवते. संगणक संपर्क व्यवस्था (network) क्षेत्रात झालेल्या प्रगतीमुळे विकेंद्रित संचालन प्रणालीचा उदय झाला. विकेंद्रित प्रणालीमध्ये कार्य एका पेक्षा जास्त संगणकांचा वापर करून पूर्ण केले जाते. एक कार्य पूर्ण करण्यासाठी अनेक संगणक विकेंद्रित संचालन प्रणालीच्या सूचनेनुसार सहकार्य करू शकतात.

अंतर्भूत

[संपादन]

अंतर्भूत संचालन प्रणाली या अंतर्भूत संगणक व्यवस्थेमध्ये वापरली जातात. त्यांची रचना लहान संगणकांमध्ये वापरण्यासाठी केलेली असते. मर्यादित साधनांमध्येही त्या काम करू शकतात. त्या अतिशय संक्षिप्त व कार्यक्षम असतात.

सकाल

[संपादन]

सकाल संचालन प्रणाली या एखाद्या घटनेवर एका ठराविक वेळ मर्यादेत प्रक्रिया करण्याची हमी देतात. घटनांच्या प्राधान्यक्रमाने त्यांच्यावर प्रक्रिया केली जाते.

मायक्रोसॉफ्ट विंडोज

[संपादन]

मायक्रोसॉफ्ट विंडोज ही व्यक्तिगत संगणकासाठी जगातील सर्वांत लोकप्रिय संचानल प्रणाली आहे. जगभरातील एकूण व्यक्तिगत संगणकांपैकी अंदाजे ९० टक्क्यांहून अधिक संगणक मायक्रोसॉफ्ट विंडोजच्या कोणत्यातरी एका आवृत्तीवर चालतात.

मायक्रोसॉफ्टच्या विंडोजच्या सध्याच्या सर्वांत जास्त वापरात असलेल्या आवृत्त्या आहेत: विंडोज ७, विंडोज एक्सपी, विंडोज व्हिस्टा.

'सर्व्हर' - 'सेवादाता संगणक' (Server computers) आणि 'समूह संगणक' (cluster computers) या संगणकांसाठी विंडोजच्या काही आवृत्त्या आहेत जसे माइक्रोसॉफ्ट विंडोज २००३ सर्व्हर.

काही छोट्या इलेक्ट्रॉनिक्स उपकरणांमध्येदेखील (उदा. लघु-संगणक - pocket computers) मायक्रोसॉफ्ट विंडोजची 'विंडोज सी.ई.' (Windows CE) ही आवृत्ती वापरली जाते.

युनिक्स

[संपादन]

युनिक्स हे एकमेकांशी साम्य असणाऱ्या काही संगणक आज्ञावलींचे नाव आहे. युनिक्स हा द ओपन ग्रुप (The Open Group) कंपनीचा रजिस्टर्ड ट्रेडमार्क आहे.

'युनिक्स लाईक' म्हणजे युनिक्सवर आधारित अथवा युनिक्सशी साधर्म्य असणाऱ्या अश्या बऱ्याच ऑपरेटिंग सिस्टिम्स सध्या प्रचलित आहेत , उदा. 'गनू/लिनक्स (GNU/Linux)', 'फ्री बी एस डी (Free BSD)', 'सोलारिस (Solaris)', 'एच्.पी. यू.एक्स (HP-UX)', 'ओपन बी एस डी (Open BSD)', 'नेट बी एस डी (Net BSD)', 'आय बी एम ए आय एक्स (IBM's AIX)'

युनिक्स ही सर्वप्रथम ए.टी अँड टी लॅब्स (AT&T Labs) मध्ये विकसित केली गेली.


गनू आणि लिनक्स

[संपादन]

गनू/लिनक्स (लिनक्स) ही एक लोकप्रिय संगणक आज्ञावली आहे जी 'मुक्त सॉफ्टवेर' आहे. लिनक्स कर्नल म्हणजे लिनक्स गाभ्यावर आधारीत ऑपरेटिंग सिस्टीम बहुतेकदा लिनक्स याच नावाने ओळखल्या जातात. मुळात लिनक्स ही स्वतः ऑपरेटिंग सिस्टीम नसून ऑपरेटिंग सिस्टीमचा एक भाग आहे. या भागावर ( लिनक्स कर्नलवर) आधारीत अनेक मुक्त स्रोत ऑपरेटिंग सिस्टीम तयार करण्यात आल्या आहेत. भारतातही लिनक्स गाभ्यावर आधारीत बॉस ऑपरेटिंग सिस्टीम, आग ऑपरेटिंग सिस्टीम या दोन ऑपरेटिंग सिस्टीमस् तयार करण्यात आल्या आहेत. लिनक्सवर आधारीत ऑपरेटिंग सिस्टीमचा सर्वात जस्त वापर 'सर्व्हर'-संगणकांवर (Server computers) होतो. ९२% पेक्षा जास्त सर्व्हर संगणक लिनक्स वर आधारीत कोणत्यातरी एका ऑपरेटिंग सिस्टीमवर चालतात. डेस्कटॉप संगणकात लिनक्सचा वाटा १.५% इतकाच आहे, परंतु गेल्या काही वर्षांत या क्षेत्रातील खुप वाटा वाढत आहे.

लिनक्स वर आधारीत काही ऑपरेटिंग सिस्टीमस्

[संपादन]

यूबुंतू

[संपादन]

यूबुंतू ( Ubuntu ) ही लिनक्स जगातील सर्वात जास्त वापरली जाणारी डेस्कटॉप (ठिय्या) ऑपरेटिंग सिस्टीम आहे. ही ऑपरेटिंग सिस्टीम डिबेन ( Debian ) या लिनक्स ऑपरेटिंग सिस्टीमवर आधारीत आहे, त्यामुळे यूबुंतू ऑपरेटिंग सिस्टीम .deb प्रकारच्या सॉफ्टवेर संचिकांचा वापर करते.


रेड हॅट

[संपादन]

रेड हॅट ( Red Hat ) ऑपरेटिंग सिस्टीम ही रेड हॅट कंपनीची ऑपरेटिंग सिस्टीम आहे. ही ऑपरेटिंग सिस्टीम .rpm प्रकारच्या सॉफ्टवेर संचिकांचा वापर करते. रेड हॅट मध्ये सर्व प्रथम .rpm संचिकांचा वापर करण्यात आला.

बॉस लिनक्स ही C-DAC द्वारा निर्माण करण्यात आलेली ऑपरेटिंग सिस्टीम आहे. परंतु मोठ्याप्रमाणात यश न मिळाल्यामुळे २००८ नंतर या ऑपरेटिंग सिस्टीमची नवीन आवृत्ती आली नाही. ही ऑपरेटिंग सिस्टीम डिबेन ( Debian ) या लिनक्स ऑपरेटिंग सिस्टीमवर आधारीत आहे, त्यामुळे बॉस ऑपरेटिंग सिस्टीम .deb प्रकारच्या सॉफ्टवेर संचिकांचा वापर करते.

डेबिअन

[संपादन]

डेबिअन ऑपरेटिंग सिस्टिम .deb प्रकारच्या सॉफ्टवेर संचिकांचा वापर करते. डेबिअनमध्ये सर्व प्रथम .deb संचिकांचा वापर करण्यात आला.

मॅक ओ.एस

[संपादन]

'मॅक ओ.एस.' (Mac OS) ही ' अ‍ॅपल कंपनीच्या 'मॅकिंटॉश' कंप्युटर्सवर वापरली जाणारी संगणक आज्ञावली आहे. ही आज्ञावली ॲपल तर्फे विकसित व वितरित केली जाते .

हे सुद्धा पहा

[संपादन]